पिंपरी-चिंचवड/नाशिक | (सद्वार्ता)
पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील ज्येष्ठ हिंदी, मराठी व अहिराणी भाषेतील साहित्यिक प्रा. संजय पवार यांना त्यांच्या साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकत्याच नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात भारत गौरव पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मानद ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.)’ पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ फेडरेशनच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद शांडिल्य यांच्या हस्ते प्रा. पवार यांना मानद डॉक्टरेटचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते त्यांना भारत गौरव पुरस्काराचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
नाशिक येथील हॉटेल रॉयल हेरिटेजच्या सभागृहात हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट फेडरेशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अजित बागमार होते. यावेळी जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, त्र्यंबकेश्वर किन्नर अखाड्याच्या संस्थापक महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या समारंभात देशातील विविध राज्यांतून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर ऑफ लिटरेचर, महाराष्ट्र गौरव, भारत गौरव आणि विश्व गौरव पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
प्रा. संजय पवार यांचा साहित्यिक प्रवास अत्यंत समृद्ध असून त्यांनी मराठी, हिंदी आणि अहिराणी या तीन भाषांमध्ये विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे देश-विदेशात प्रकाशन झाले असून त्यांच्या काही साहित्यकृतींना विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही स्थान मिळाले आहे. साहित्य, शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
यावेळी डॉ. सच्चिदानंद शांडिल्य यांनी मानद डॉक्टरेटचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, विविध क्षेत्रांत उत्कृष्ट व मौलिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. मानद पदवी ही केवळ सन्मानाची बाब नसून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची अधिकृत दखल आहे.
समारंभात महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी, डॉ. रामकृष्णदास महाराज, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज आणि डॉ. अजित बागमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार वितरणावेळी विरंजय पवार, शशिकांत निकुंभ, डॉ. जसपालसिंह वलवी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांनी प्रा. संजय पवार यांचे अभिनंदन केले.